Saturday, May 6, 2023

भगवान महावीर


                   भगवान महावीर
   सदाचाराचा ध्वज हाती घेवून त्यागपूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या भगवान महावीरचा जन्म कुंडपूर नगरीत इ. स. पूर्वी ५९९ साली चैत्र शु. त्रयोदशीस झाला. त्याच्या मातेचे नाव त्रिशला व पित्याचे नाव सिद्धार्थ सिद्धार्थ हा क्षात्रतेजयुक्त असा राजा होता. भगवान महावीराचे जन्म नाव वर्धमान, वर्धमान बालक असतानाच्या लीला प्रसिद्ध आहेत. वर्धमान हा अतिशय निर्भिड व धैर्यशाली होता. भीति हा शब्दच त्याच्या जीवनात नव्हता. बालपणी एका उन्मत्त हत्तीला त्याने नमविले होते. त्याची ती बहादुरी पाहून सारे त्याला 'महावीर' म्हणू लागले.आपल्या सुपुत्राने विवाह करून गृहस्थाश्रमी व्हावे असे त्रिशला व सिद्धार्थ यांना वाटत होते परंतु महावीराने यास नकार दिला. मोहमायेच्या बंधनात राहणे त्यास पसंतच नव्हते. महावीर वैरागी होवू इच्छित होते.
    वयाच्या तिसाव्या वर्षीच त्यांनी सर्वसंग परित्याग केला व संन्यासी झाले. संन्यास घेतल्यानंतर कठोर तपोसाधना केली व ज्ञान प्राप्त करून घेतले. तपोसाधनेच्या काळात त्यांचा बराच छळ झाला परंतु आत्मसंयमी महावीराने त्या विरूद्ध कधीच ब्र काढला नाही. कुसारग्राम येथे त्यांच्यावर बैल चोरल्याचा आरोप केला. ढोंगी म्हणून निर्भत्सना केली परंतु महावीराने सारे सहन केले. महावीर इतके विरक्त होते की ते दिगंबर अवस्थेत फिरत, त्याच अवस्थेत राहात. स्वतःजवळ कोणतेही वस्त्र वा भांडे नसायचे, ते हातावरच भाकर घेवून खात, दिवसातून एकदाच जेवत. पाणी सुद्धा जेवणाचे वेळीच पित. त्यांनी आयुष्यभर कठोर नियमांचे पालन केले व अनुयायांना तेच नियम पालन करण्याचा उपदेश केला.
      महावीराचा पहिला शिष्य गौतम इन्द्रभूमि, त्यानंतर हजारो शिष्य झाले. दरवर्षी चातुर्मास्य करण्याची प्रथा पाडली. महावीराचे ज्ञान, वैराग्य पाहून त्यांना लोक तीर्थकर म्हणू लागले. ज्ञानप्राप्तीनंतर महावीरांने जैन धर्माचा ३२ वर्ष प्रचार-प्रसार केला. असे हे तीर्थकर वयाच्या ७१ व्या वर्षी पावापुरी येथे इ.स. पूर्व ५२५ च्या कार्तिक मासात निर्वाण पद पावते झाले त्यांची ज्ञान ज्योती अद्यापही चहुकडे प्रकाशित होवून सम्यक ज्ञान प्रदान करीत आहे. त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात करावा अशी त्यांची अपेक्षा आहे.
 
लेखक
प्रा. रघुनाथ कडवे 

No comments:

Post a Comment

राष्ट्रसंत तुकडोजीची ग्रामविकास दृष्टी

ग्राम तसा देश १. गावचि भंगता अवदशा ग्राम हा विश्वाचा नकाशा । गावावरून देशाची परीक्ष। गावचि भंगता अवदशा । येईल देशा ।। (ग्राम १.४९) ग्राम ही ...