ग्राम तसा देश
१. गावचि भंगता अवदशा
ग्राम हा विश्वाचा नकाशा । गावावरून देशाची
परीक्ष।
गावचि भंगता अवदशा । येईल देशा ।। (ग्राम १.४९)
ग्राम
ही विश्वाची लहानशी प्रतिकृती आहे. विश्वात जशी नाना वृत्तीची जनता वास करते तशीच
जनता गावात आहे, विश्वात जशी विविध प्रकारची घरे आहेत तशीच विविधतेने नटलेली घरे
ग्रामात आहेत. विश्वात जसे निसर्ग सौंदर्य आहे तसेच ग्रामात आहे. विश्वात
सर्वजातीचे, सर्वपंथाचे अन् सर्व धर्माचे अनुयायी आहेत तसेच ग्रामात आहेत, विश्वात
जसे नाना प्रकारचे व्यवसाय करणारे लोक आहे तसेच ग्रामात आहेत. विश्वात
श्रीमंत-गरीब, मालक-मजूर आहेत तसेच ग्रामात आहेत. हे विश्व जसे विविध कलांने
नटलेले आहे तसेच ग्रामही विविध कलांनी नटलेले आहे. म्हणूनच वं. महाराज ग्राम हा
विश्वाचा नकाशाच आहे' असे मोठ्या आत्मविश्वासाने या विश्वातील लोकांना
ग्रामगीतेच्या माध्यमातून सांगत आहेत.
२. गाव हा देशाचा पायाभूत घटक
देश
हा विश्वाचा घटक आहे आणि ग्राम हा आपल्या देशाचा घटक आहे. जगातील बहुतांश देशात
ग्राम हाच घटक आहे. आपल्या भारत देशात सात लाख खेडी आहेत अन् सुमारे चौसष्ट
प्रतिशत जनता खेड्यातच राहात आहे. म्हणूनच गाव जसे असेल तसेच देशाचे रूप दिसेल.
गाव उन्नत असेल तर देश उन्नत होईल अन् गाव अवनत असेल तर देश अवनत राहील. गाव हाच
देशाचा पायाभूत घटक आहे. गावचि जरी उत्तम नसेल । तरि देशाचे भवितव्य ढासळले ||(१.५२) याची आठवण ग्रामगीता करून देवून या देशातील नागरिकांना देशौन्नतीचा
पाठ शिकवित आहे.
३. गाव भंगता कामा नये
गाव
ही जणु देशाच्या इमारतीची वीट आहे. एक-एक वीट उत्कृष्टपणे जोडावी लागते, तेव्हाच
इमारत उभी होते. त्या इमारतीला सफेदी केली, रंगरंगोटी दिली की ती सुंदर दिसते.
तसेच प्रत्येक देशाचे आहे. गाव भंगले की देश भंगल्याशिवाय राहणार नाही, गाव ओसाड
पडले, गावात रान माजले, गाव दुभंगले तर सारा देश दुभंगेल एवढेच नव्हे तर
ग्रामगीतेच्या मते गाव भंगताच देशात अवदशा येईल म्हणून गाव भंगता कामा नये, गावात
अवदशा येणार नाही याची काळजी या देशातील प्रत्येक नागरिकाने घेतलीच पाहिजे असे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मोठ्या कळकळीने आम्हास पन्नास वर्षापूर्वीच
सांगितले आहे.
ग्रामगीता ही ग्रामावरची प्रथम गीता आहे. ग्रामविकासासाठीच राष्ट्रसंतांनी ग्रामगीता हा युगग्रंथ लिहिला. आतापर्यंत या विश्वात कहाण्या सांगणाऱ्या अनेक गीता लिहिल्या गेल्या. वं. महाराज ग्रामगीतेत म्हणतात-कृष्णगीता, रामगीता । हंसगीता, हनुमंत गीता । शिवगीता, अवधूतगीता । कथिल्या कोणी ||(१.६९)गुरुगीता, गणेशगीता। पांडवगीता, भगवद्गीता । देवगीता, देवीगीता । सर्व झाल्या ||(१.७०)सर्व देवगीता, देवीगीता झाल्यात परंतु ग्रामगीता ही ग्रामाची दशा सांगणारी प्रथम गीता होय.
४. ग्रामाची कहाणी सांगणारा महात्मा
'विश्वब्रह्म'
बोलणारे हजारो नव्हे लाखो झालेत परंतु ग्रामाची कहाणी सांगणारे कुठेच दिसले नाहीत.
'जाणावे ग्राम हेचि मंदिर ।ग्रामातील जन सर्वेश्वर' हे सांगणारे कुठेच भेटले
नाहीत. ज्याच्या श्रमावर सारे जगतात त्या ग्रामनाथाविषयी सविस्तर बोलण्याची इच्छा
कोणास झालीच नाही. राष्ट्रसंत तुकडोजी हेच असे एक महात्मा विसाव्या शतकात झाले की
त्यांनी 'ग्रामनाथाच्या श्रमास प्रतिष्ठा मिळो' यासाठी ग्रामावरून ग्रामगीता
सांगीतली आणि वास्तविकतेचे दर्शन करून दिले. ग्रामगीता आणि ग्रामनाथ यांचे त्यांनी
नातेच जोडून दिले. ग्रामविकासाला गती न येण्याची कारणे विस्तृतपणे साध्या, सोप्या
भाषेत समजावून सांगितली आणि ग्रामविकासासाठी आवश्यक उपाय सुचविले. जसे ग्राम जीवन
असेल तसाच हा देश घडेल असे ग्रामीण जीवन विद्यालयात अध्ययन केलेल्या या महापुरुषाने
इशारा दिलेला आहे.
महाराज
१९४९ सालच्या मे महिन्यात लिहिलेल्या एका लेखात म्हणतात,‘“विश्व विद्यालय में मैने
अभ्यास जरूर किया है, परंतु ग्रामीण जीवन काही वह विद्यालय मैंने चुन लिया
था।"
५. ग्रामगीता ग्रामनाथालाच अर्पण
ग्रामगीता
ज्या ग्रामनाथाच्या उत्कर्षासाठी लिहिली त्याच ग्रामनाथाला ती अर्पण केली. ती
ग्रामनाथालाच कां बरं अर्पण केली असावी याचे कारणही राष्ट्रसंतांनी स्पष्ट केले
आहे. पहिले कारण सर्व जगातील लोकांना अन्न-वस्त्र- पात्र देणारा ग्रामनाथ आहे
परंतु स्वतः दुःखच भोगतो आहे. त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा इतर व्यवसायिक देत नीह,
या उलट आम्ही बौद्धीक श्रम करणारे श्रेष्ठ आहोत असा त्यांनी समज करून घेतलेला आहे.
'कष्ट करोनि महाल बांधसी। परि झोपडीहि नाही नेटकीशी' हा आजही वस्तुस्थितीच आहे.
देशाच्या
स्वातंत्र्यासाठी याच ग्रामनाथांनी लढा दिला होता. ब्रिटीशाच्या नोकरांनी तर
ब्रिटीशांचीच बाजू घेतली होती. ब्रिटीश कंपन्यावर अवलंबून असलेल्या उद्योगपति अन्
व्यापाऱ्यांनी ब्रिटीशांनाच साथ दिली होती. नोकरांनी नोकऱ्या सोडल्या नाहीत अन्
व्यापाऱ्यांनी व्यापार सोडलाच नाही. ब्रिटीश सत्तेशी खरा लढा ग्रामनाथांनीच दिला.
अशा ग्रामनाथाच्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, त्याचेकडे सकळांचे लक्ष वळो यासाठीच
राष्ट्रसंतांची ग्रामगीता आहे.' 'मित्रत्व नांदो त्रैभूवनी' ही राष्ट्रसंतांची
इच्छा आहे. ग्रामात मित्रत्व राहिले की देशात मित्रत्व राहील. ग्राम तसाच देश बनेल
यात शंकाच नाही. ग्राम तसाच देश होईल याची जाणीव शासक-प्रशासक, उद्योगपति
व्यापारी-मजदूर यांना होणे ही आजही गरज आहे. ग्रामगीतेतील विचार या दृष्टीने
विस्तारित करीत आहे.
जय गुरु 🚩🚩
लेखक - प्रा. रघुनाथ कडवे

